भारतातील सर्वात मोठा शिलासेतु- आणे घाटातील नैसर्गिक पुल
पंचमहाभूतांची ताकद आपण कोण आजमावणार? पण हा, त्यांची अनुभूती घ्यायची असेल तर डॉ. कार्व्हरच्या भाषेत डॉ. जगदिशचंद्र बोसांच्या बोलीत निसर्गाशी तादात्म्य पावले पाहिजे. मग बघा निसर्ग कसे आपल्या मनातील अंतरंग खोलत जातो ते. डॉ. कार्व्हर, डॉ. बॉस. डॉ. सलीम अली यांची वंशावळ मारुती चित्तमपल्लीपर्यंत पोहोचते. आणि गंमत म्हणजे त्याला पुढे खुप साऱ्या फांद्या फुटत जातात. जुन्नरच्या भूभागावर ११ टक्के जंगल शिल्लक आहे, सह्याद्रीच्या आठवणी सांगत जुन्नरभर फैलावलेल्या वऱ्हाडी डोंगररांगा आहेत. हे डोंगर, त्यावरून वाहणारे प्रपात, डोंगराच्या उंचीला आव्हान देणारा सोसाट्याचा वारा, कातळाच्या रंगीबेरंगी खड्यांतून सजलेल्या मातीवर मेहंदी काढावी अशी हिरवाईने नटलेल्या देवराया सगळंच त्या पंचमहाभूतांची अनुभूती देणारे. आणि या सर्वांच्या आसऱ्याने गुण्या गोविंदाने नांदत इतिहास सांगणारे दुर्गवैभव, ध्यानस्थ लेणीवैभव, भक्तिरसात मग्न मंदिरे, सुफियाना अंदाजातून अध्यात्म सांगणारे दर्गे आपल्याला त्याच पंचमहाभूतांची वाट दाखवतात. मग काय, एक एक ठिकाण आश्चर्य म्हणुन समोर येऊ लागते, त्यातलाच एक म्हणजे भारतातील सर्वात मोठा शिलासेतू, आणे घाटातील नैसर्गिक पुल.
आणे घाटातील शिलासेतू:
आळेफाट्यावरून कल्याण नगर या २२२ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाने नगरकडे जात असताना, साधारण १२ कि मी अंतरावर नागमोड्या वळणाचा आणे घाट लागतो. २-३ वळणानंतर, उजवीकडे गणपतीचे मंदिर दिसते आणि त्याच्या बरोबर विरुद्ध बाजुला मळगंगा देवी मंदिराकडे जाणारी छोटेखानी महिरप आपले स्वागत करते. तिथे बाजुलाच आपले वाहन लावावे, आणि ५-७ मिनिटांची पायऱ्यांची सोपी उतरण चालायला तयार व्हावे. दोन डोंगरांच्या मधील खिंडीत उतरत, अदृश्य होणारी पायऱ्यांची वाट तशी सोपीच आहे, ज्यांना खाली उतरून जाणे शक्य नाही, त्यांनी महामार्गाने तसेच पुढे जाउन वरूनच नैसर्गिक पुलाचे याची देही याची डोळा दर्शन घेतले तरी चालेल. शंभर सव्वाशे पायऱ्या उतरून जात असताना, आजूबाजूच्या गिरीपुष्पाच्या थोड्याफार जंगलातून उतरत जाणारी पायरीवाट आपल्याला खाली खिंडीत घेऊन जाते आणि समोर दिसते ते या निसर्गाचे राजवैभव, आजूबाजूच्या डोंगरमाथ्याच्या पठारावरील पावसाचे पाणी उताराने वहात खाली यायचे, त्याचा मोठा प्रपात बनायचा, पण डोंगराची एक खाली उतरत आलेली नाळ पाण्याच्या प्रवाहाची वाट आडवायची. इथे २ पंचमहाभूतांची एकमेकांना आव्हाने असायची, कारण अग्निजन्य खडक त्यामुळे पोलादी ताकद आणि पाण्याचा वेग म्हणजे दुधारी तलवार, अजस्र डोंगर पाण्याला अडवतोय कि बेभान पाणी डोंगराला फोडतंय या धुमश्चक्रीत अखेर विजय पाण्याचा झाला आणि खडकाला फोडून पाण्याने आपली वाट बनवली. हे घडायला सुरवात झाली असेल काही हजारो वर्षांपूर्वी कारण पाण्याला वाट तर मिळाली होती पण त्याला सहजासहजी वाहू देईल तो पर्वत कसला? छोट्याशा सापटीतून वाहणारी धार हळूहळू कातळ कापु लागली आणि हजारो वर्षांच्या प्रक्रियेतून आज ९ मी उंचीचा आणि २२ मी लांबीचा शिलासेतू बनला. पावसाच्या पाण्याचेच हे काम असल्यामुळे, त्यावेळी इथे होणाऱ्या आवाजाची, फुत्काराची भीती आसमंतात गुंजत असेल. कदाचित म्हणुनच मानवाने स्वतःची भीती घालवायला त्या ठिकाणी मळगंगा देवीचे स्थान बनविले असावे. आजमितीला एक छानसे मंदिर त्याठिकाणी उभे आहे. खूप सारे भाविक भक्त तिथे दर्शनाला जात आहेत. पण भारतातील या सर्वात मोठ्या शिलासेतु कडे पाठ फिरवून. आपण श्रद्धेने दर्शन घ्याच पण त्याचसोबत या पंचमहाभूतांची अनुभूती पण घ्या. आळेफाट्यापासुन १८ किमी अंतरावर आणि आपल्या पराशर कृषी पर्यटन केंद्रापासून १२ कि मी [२० मिनिटांच्या अंतरावर] असलेला हा भारतातील सर्वात मोठा शिलासेतू आपले स्वागत करायला तेवढाच उत्सुक आहे. आपण तिथे नक्की जा पण कुठलाही कचरा न करता एक जबाबदार पर्यटक म्हणुन. जबाबदार पर्यटनासाठी आम्ही जुन्नरकर आपले सहर्ष स्वागत करत आहोत.