आपल्या मराठी संस्कृतीची ओळख परदेशातील लोकांना लोप पावत चाललेली मराठी ग्रामीण संस्कृती, परंपरा, खाद्य, सण, उत्सव पुन्हा एका नव्या जोमाने आपल्या आणि परदेशातल्या लोकांसमोर घेऊन आला आहे एक आपल्याच मराठी मातीचा मराठी तरुण. आपल्या मराठी संस्कृतीची ओळख परदेशातील लोकांना करुन देण्यासाठी जुन्नर मधील राजुरी गावातील कु. मनोज हाडवळे ह्या तरुणाने ’ऍग्रोटुरिझम’ ह्या संकल्पनेला मराठी संस्कृतीशी जुळवुन ’पराशर ऍग्रोटुरिझम’ ची स्थापना राजुरीमधे केली. पराशर मार्फ़त निरागस ग्रामीण संस्कृतीला नवा रंग देऊन तिचा प्रसार महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या शहरांतील आणि परदेशातील लोकांमधे केला जातो. एक दिवस असाच राजुरीच्या पराशर ला भेट दिल्यास तुम्हाला पुन्हा गावाकडं आल्याचा खरा आनंद नक्किच मिळतो. गाईचं ताजं दुध, शेतातील ताजी फ़ळं, चुलिवरची भाकर-कालवन, गरम गरम मासवडी, गोडगोड पोळ्या, झनझनीत मिसळ, चविष्ठ वडापाव, बैलगाडीचा फ़ेरफ़टका, डाळिंबाची-द्राक्षाची-सिताफ़ळाची डौलदार बाग, समोर डोंगरावर उतरलेले ढग, पाऊस आणि उन्हाची लपाछपी, आकाशात उंच जाणारा झोका, रात्री मनाला शांत करणारं संगीत, माथ्यावरुन दिसणारं गाव असं किती आणि काय काय… जो ग्रामीण आनंद आपण शहरात राहुन विसरुन गेलोय तोच… पराशर ला आजवर हजारो देशातील आणि परदेशातील पाहुण्यांनी भेटी देऊन आपल्या संस्कृतीच, खाद्यपदार्थांचं आणि सणांचं कौतुक केलं आहे असं मनोज सांगतो.
आपली संस्कृती जगभरात पोहचवण्यासाठी सदैव कटिबध्द मनोज जुन्नर मधील पर्यटनासाठी देखील काम करत आहे. “सातवाहन काळापासुन महत्व प्राप्त झालेल्या आणि स्वत: शिवाजी महाराजांनी जन्म घेतलेल्या ह्या जुन्नर तालुक्यात असंख्य पर्यटन क्षेत्र आहेत ज्यांनादेखील मला जगासमोर ठेवायची आहेत. शिवकालीन आणि प्राचिन महत्व प्राप्त जुन्नर अनेक परदेशी पाहुण्यांना आवडला आहे व त्यांनी तोंडभरुन शिवनेरी, लेण्याद्री, ओझर, नानेघाट चं कौतुक केलं आहे. छ. शिवाजी महाराजांचा इतिहास परदेशी पर्यटकांना सांगताना छाती भरुन येते. आपली मराठी संस्कृती टिकवण्याचं आणि वाढवण्याचं काम आम्हा मराठी तरुणांचं आहे आणि मी ते चोख करतोय.” असं मनोज सांगतो.
पराशर चं यश पाहुन महाराष्ट्र सरकारच्या ’महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने’ पराशरची दखल घेतली. तसेच बॉलीवुड व मराठी चित्रपट सृष्टीतील कलावंतांसाठी पराशर आवडतं ठिकाण झालं आहे. मनोज ला सकाळ ऍग्रोने सन्मानित केलं तसेच पराशरला जागतिक कृषी पर्यटन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.