डोंगरदर्यांनी वेढलेल्या जुन्नर परिसरात जेवढी गडकोटांची संख्या जास्त आहे, तेवढीच धरणांचीही. कुकडी, मीना, मांडवी व पुष्पावती या नद्या जुन्नर व परिसरातून वाहतात. यापैकी कुकडी नदीवर दोन – येडगांव व माणिकडोह तर मीना नदीवर वडज, मांडवीवर चिल्हेवाडी व पुष्पावतीवर पिंपळगाव जोगे धरण बांधलेले आहे. कुकडी व पुष्पावतीचे संगमस्थान असणारे येडगाव धरण सोडले तर इतर धरणे ही डोंगर दर्यांनी वेढलेल्या भागात बांधलेली आहेत. त्यामुळे ती निसर्गातील सौंदर्यस्थळे असल्याची दिसतात.
चिल्हेवाडी धरण हे या पाचही धरणांपैकी सर्वात छोटे परंतु, सर्वात आकर्षक धरण होय. पुणे जिल्ह्याच्या अतिउत्तरेला नगर जिल्ह्याला लागून हे धरण बांधण्यात आले आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक दर्यांचा व कड्यांचा वापर या धरण बांधणीत करण्यात आलाय. सर्वसाधारणपणे धरण म्हणजे सपाट भूपृष्टावरुन येणारे पाणी खोल जमीनीवर साठवण्याची रचना मानली जाते. काही धरणे मात्र या संकल्पनेला छेद देतात. त्यापैकीच एक धरण म्हणजे चिल्हेवाडी धरण होय. कातळकड्यांनी बनलेल्या दर्यांनी घेरलेल्या भागात चिल्हेवाडी धरण आहे.
चिल्हेवाडी धरणाकडे जाण्यासाठी जवळचे सर्वात मोठे गांव आहे, ओतूर. जुन्नर तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ वर ओतूर वसलेले आहे. नारायणगावं आगाराच्या एसटी बसेस ओतूर येथून थेट चिल्हेवाडीला जाण्यासाठी नियमित अंतराने मिळू शकतात. परंतु, या रस्त्याने थेट धरणाच्या बंधार्यावर जाता येते त्यामुळे धरणाची संपूर्ण रचना नीट ध्यानात येत नाही. डोंगर टेकडीवरुन अर्थात वरच्या बाजुने धरण पहायचे असल्यास थेट मांदारणे गांव गाठावे लागेल. ओतुरहुन माळशेज कडे जाणार्या रस्त्यावर दोन-तीन किमीवर उदापूर हे गांव आहे. तेथून उजवीकडचा रस्ता मांदारणे घाटातून जातो. या मार्गाने जाण्याकरिता ओतुरहून कोपरे-मांडवे ही बस पकडावी व मांदारणॆ घाट उतरल्या वर मांदारणे या गावी उतरावे. इथला पूर्ण परिसर हा डोंगराळ आहे. मांदारणे गावातून उजव्या बाजुचा एक कच्चा रस्ता चिल्हेवाडी धरणाकडे जातो. हा रस्ता दोन ते तीन किलोमीटरचा आहे. स्वतःची दुचाकी असल्यास तो पार करणे सोपे जाते. जसजसे या रस्त्याने आपण पुढे जातो तसतसा दरीचा अंदाज येत जातो. या रस्त्याने शेवटच्या टोकावरील एका टेकडीवर शेतांतून मार्गक्रमण करत गेल्यावर चिल्हेवाडी धरणाचे नयनरम्य दृश्य दिसते. चहु बाजुंनी कडे असल्याने पाणी अत्यंत स्थिर दिसून येते. त्यामुळे पाण्यातील जलचरांनी थोडी जरी हालचाल केली तरी ती या शांत पाण्यात मनोवेधक असते.