जुन्नरमधील कुकडी नंदीचे उगमस्थान असलेल्या पुर या गावी साधारण ९ व्या शतकात झंज राजाने या हेमाडपंती मंदिराची निर्मिती केली. नाशिकच्या त्रंबकेश्वरपासुन ते भीमाशंकर पर्यंत, नदीच्या उगमस्थानी शिव मंदिराची उभारणी करण्यात आली होती. त्यातली ३ मंदिरे जुन्नरमध्ये आहेत. खिरेश्वर, कुकडेश्वर आणि ब्रम्हणाथी मंदिर, पारुंडे, पैकी कुकडेश्वर मंदिराची कलाकुसर डोळ्याचे पारणे फेडणारी आहे. घोटीव दगडातील कोरीव काम, गंधर्व, यक्ष आणि त्यांच्या अगणित कथा इथे शिल्प रुपाने कोरण्यात आलेल्या आहेत. मध्यंतरी हे मंदिर डागडुजी ला आले होते. पुरातत्व खात्याने हे शिव धनुष्य उचलून पुर्ण मंदिर खोलून त्याच्या प्रत्येक दगडाला नंबरिंग करून पुन्हा आहे तसे संकलित केले आणि त्यात होणारी पाण्याची गळती थांबवली. आता हा प्राचीन ठेवा सर्वांसाठी अजुन काही काळ नक्कीच सुस्थितीत राहील यात शंका नाही. कुकडेश्वर ला पोहोचण्यासाठी मार्ग फार सोपा आहे. जुन्नर हून नाणे घाटाकडे जात असताना चावंड ओलांडले की कुकडेश्वरचा फाटा लागतो. जुन्नरपासून हे अंतर २०-२२ की मी चे आहे. त्या फाट्याहून डावीकडे २-३ की मी वर पुर गाव आणि कुकडी नदीचे उगमस्थान अर्थात कुकडेश्वराची अप्रतिम अशी कलाकुसर आहे.
नाणेघाटाला जाताना थोडी वाट वाकडी करून इथेही जा ..तुम्हाला नक्कीच आवडेल. जुन्नर पर्यटन मॉडेल मनोज हाडवळे
कुकडेश्वर शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरांपैकी एक आहे. अखंड दगडात केलेले कोरीव काम आणि स्थापत्य कलेचा उत्तम आविष्कार असलेले हे मंदिर तुलनेने अप्रसिद्ध आहे. सदर मंदिर पांडवकालीन असल्याचे समजले जाते. प्रत्यक्षात इ. स. ७५० ते ८५० च्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. या मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो. पुढे याच नदीवर माणिकडोह धरण आहे. या धरणामुळे जुन्नर परिसर संपन्न बनला आहे.