गेश्वर मंदिर, खिरेश्वर – साबळेजुन्नर तालुका निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत अगदी संपन्न…निसर्ग वेड्याच्या नजरेत भरावा असाच आहे….
यातील माळशेज घाटाशेजारील हरिश्चंद्रगडावर जाणा-या वाटेत असणारे खिरेश्वर म्हणजे निसर्गाविष्कार जपणारे एक लहानसे आदिवासी वस्ती असणारे गाव…..
या गावातच दडलेले नागेश्वर मंदिराचे नवल आवर्जून पाहावे असेच आहे.शिलाहार वंशातील झंज नावाच्या राजाने दहाव्या शतकात हे मंदिर बांधले.
नाशिकच्या गोदावरीपासून भीमाशंकरच्या भीमेपर्यंत तब्बल १२ नद्यांच्या उगमस्थळी या झंज राजाने मंदिरे बांधली. यातीलच पुष्पावती नदी उगमस्थळावरचे हे नागेश्वर मंदिर! बाहेरून साधेसुधे वाटणाऱ्या या मंदिरात शिरल्यावर आतील त्याची कोरीव श्रीमंती नजरेत सामावत नाही. विविध भौमितिक आकारातील स्तंभ, त्यांना यक्षांचे दिलेले आधार, भिंतीतील देवकोष्टे, विविध रूपकांनी सजवलेले प्रवेशद्वार आणि सर्वात महत्त्वाचे छतालगत लगडलेले वैदिक देवतांचे शिल्पपट हे सारे सारेच विलक्षण आहे….
जुन्नरमधील प्राचीन संस्कृतीची श्रीमंती जपणारे हे मंदिर आज ऊन, वारा आणि पाऊस यांना झेलत काहीसे दुर्लक्षित असल्याने आपले गुडघे टेकत आहे कि काय असाच भास त्या मंदिरावरील कोसळत असणारे दगड पाहून वाटते….