. सुमारे दोनशे लेणी या परिसरात पाहता येतात. ती शक – सातवाहनांच्या काळात खोदली गेली होती. नारायणगांव जुन्नर रस्त्यावर जुन्नर मध्ये प्रवेश करतेपूर्वी डाव्या बाजुला एक डोंगर दिसतो. तीन किलोमीटरचा विस्तार असलेला हा डोंगर म्हणजे मानमोडी डोंगर होय.

-
स्थळ : मानमोडी लेणी ता.जुन्नर जि.पुणे
-
ऊंची : ८६० मी.
जुन्नरची खरी ओळख ही केवळ शिवनेरी हीच नसून सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास या परिसराला लाभलेला आहे. जुन्नर परिसरात महाराष्ट्रातील सर्वात जास्त लेणी खोदलेली आहेत. सुमारे दोनशे लेणी या परिसरात पाहता येतात. ती शक – सातवाहनांच्या काळात खोदली गेली होती. नारायणगांव जुन्नर रस्त्यावर जुन्नर मध्ये प्रवेश करतेपूर्वी डाव्या बाजुला एक डोंगर दिसतो. तीन किलोमीटरचा विस्तार असलेला हा डोंगर म्हणजे मानमोडी डोंगर होय. मानमोडीच्या पोटात तीन लेणी समुह आहेत! मुख्य रस्त्यापासुन साधारणत: दोन किमी आत गेल्यावर मानमोडीच्या पायथ्याशी पोहचता येते. अंबिका नगर नावाची छोटी वस्ती इथे आहे. इथुनच मानमोडीच्या लेण्यांकडे जाण्याची वाट आहे. सध्या हा परिसर जुन्नर वनविभागाच्या ताब्यात आहे. त्यांनी या डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन केल्याने तो दाट झाडीचा बनलाय. शिवाय लेणी पहायला येणार्या पर्यटकांची संख्या कमी असल्याने झाडीत रुळलेल्या पायवाटाही शोधाव्या लागतात! मानमोडीत तीन लेणीसमुह आहेत. त्यांना डावीकडून अनुक्रमे भीमाशंकर लेणी, अंबिका लेणी व भुतलेणी म्हणतात. यापैकी भीमाशंकर व अंबिका लेण्यांकडे पायथ्यापासून जाण्यासाठी बर्यापैकी वाटा आहेत.
तसेच तीन्ही लेण्या ह्या पायवाटेने एकमेकांशी जोडल्या असल्याने अन्य लेण्याही पाहता येतात. परंतु, सध्या तरी या वाटा व्यवस्थित तयार करणे गरजेचे दिसते. स्थानिक लोक सांगतात की , या लेण्या पाहताना मान मोडल्याची वेळ येते म्हणुन डोंगराला ’मानमोडी’ म्हणतात. परंतु, जाणकारांच्या मते मानमोडी हा मानमुकुट या शब्दाचा अपभ्रंश आहे, असेही म्हटले जाते. खरोखरच मानमोडीच्या लेण्या ह्या जुन्नरचा एकेकाळी मानमुकुट असाव्यात, हे त्यांच्या सर्वांग सुंदर रचनेवरुन दिसते. मानमोडीच्या डोंगरातील लेण्यांचा पहिला गट भीमाशंकराच्या बाजूला असल्याने त्याला भीमाशंकर लेणी म्हणतात. सध्या इथे जाण्याची वाट बर्यापैकी ढासाळलेली आहे. त्यामुळे सावधपणे लेण्यांपर्यंतची चढाई करावी लागते. स्थानिकांच्या म्हणण्याप्रमाणे आज लेण्यांची रचना पाह्ताना खरोखरच मान मोडण्याची वेळ येते असे म्हटले तर अतिशयोक्तीचे ठरणार नाही! अठरा लेण्यांच्या या गटामध्ये एक चैत्यगृह व उर्वरित विहार आहेत. मुख्य लेण्यांची नक्षीदार कलाकृती पाहिली की, शिल्पकाराला मनोमन सलाम ठोकावासा वाटते. सर्वांग सुंदर कलात्मकता मानमोडीच्या सर्वच लेण्यांमध्ये दिसते. आधुनिक काळातील स्थापत्य अभियंतेही इतक्या सुंदर लेण्या बनवू शकणार नाहीत, इतका आखीव रेखीवपणा या लेण्यांमध्ये आहे. भीमाशंकर लेण्यांच्या उजव्या बाजुने एक पायवाट ही अंबिका लेण्यांकडे जाते. पंधरा मिनिटांच्या पायपीटीनंतर अंबिका लेण्यांसमोरील सपाट भुपृष्ठावर जाता येते. या लेण्यांसमोर बरीच जागा रिकामी आहे. त्यामुळे पुर्ण लेणी एका दृष्टीतही पाहता येतात. स्थानिकांनी एका विहारात अंबिका देवीची स्थापना केली आहे. यावरुनच या गटाला अंबिका लेणी असे म्हणतात. ही लेणी तीन मजली लेण्यांप्रमाणे तयार केलेली आहेत. या ठिकाणीही एक चैत्यगृह दिसते.
शिवाय प्राकृत भाषेतील व ब्राम्ही लिपीत लिहिलेले अनेक शिलालेख मानमोडीच्या सर्वच लेण्यांत कोरलेले आहेत. अंबिका गटात पाण्याची बरिच टाकी खोदल्याची दिसतात. पावसाळ्यात ती जवळपास पूर्ण भरुन जातात. अंबिका लेण्यांतील सर्वात वरच्या विहारांवर जाण्यासाठीच्या वाटा उध्वस्त झाल्यात. त्यामुळे तेथे केवळ रॉक क्लायबिंग करणारेच जावू शकतात. या गटातील काही लेणी अपूर्ण असल्याचे दिसते. अंबिका लेण्याच्या उजव्या बाजुचा रस्ता भूतलेण्यांकडे जातो. झाडीतून पायवाट शोधत तिथवर पोहचातला पंधरा ते विस मिनिटे पुरतात. नावाप्रमाणे भुतलेणीचा भुताशी मोठा संबंध आहेच. अर्थात इथे भुतांचा वावर नाहिये. तर स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अशी लेणी केवळ भुतच बांधु शकतात त्यामुळे त्यांना भुत लेणी म्हटलं जात. अर्थात लेण्यांच सौंदर्य वर्णन करताना ही बाब सांगितली तरी पुष्कळ आहे. ही लेणी सुध्दा दोन मजली आहेत. मानमोडीच्या लेण्यांचा शेवट भुतलेण्यांच्या चैत्यगृहापाशी होतो. इथुन शिवनेरी व लेण्याद्रीच्या लेणी ही दिसतात. भुतलेणीही अत्यंत अडचणीच्या ठिकाणी आहेत. जुन्नर परिसरातील हा वारसा पाहण्याकरिता केवळ इतिहास तज्ञ तसेच बौद्ध अभ्यासकच येतात. त्यामुळे ती दुर्लक्षित आहेत. त्यांच्या अपूर्ण अवस्थेमुळे ध्यानात येते की पुर्ण मानमोडी डोंगरच लेण्यांनी नटला जाणार होता. असे झाले असते तर एक वैभवशाली अविष्कार आपल्या समोर दिसला असता. १० व्या-१२ व्या शतकात लेणी स्थापत्य कला लोप पावली असे म्हणतात. त्याच सोबत खरी भारतीय स्थापत्य कलाही लोप पावली होती. आपल्या पुर्वजांनी ही कोरीव लेणी बनविताना अत्युच्च कलेचा आविष्कार साध्य केला होता. तो संवर्धन करण्याची जबाबदारी त्यांनी आपल्यावर टाकली आहे.
माहिती आभार : प्रतिक साबळे