जीवधन किल्ला—-हा किल्ला म्हणजे चहूबाजूने उभा तुटलेला एक कडा आहे. जिथे शत्रूचा तोफखानाही चालत नाही. गडावर जाणारी वाट उभ्या कातळातून शिडीसारखी वर चढते.

-
स्थळ :जिवधन, ता.जुन्नर जि.पुणे
-
किल्ल्याची ऊंची : ११४५ मीटर
-
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
-
डोंगररांग : नाणेघाट
जीवधन किल्ला—-हा किल्ला म्हणजे चहूबाजूने उभा तुटलेला एक कडा आहे. जिथे शत्रूचा तोफखानाही चालत नाही. गडावर जाणारी वाट उभ्या कातळातून शिडीसारखी वर चढते. खोबण्याचा मार्ग व त्यावरील दीड फूट उंचीच्या २४० पायऱ्या चढण्यास कठीण आहेत. वायव्येस किल्ल्यापासून अलग झालेला निमुळता सुळका असून, इथे समोर भयंकर खोल दरी दिसते.पुणे जिल्हय़ातील जुन्नरपासून २७ किलोमीटरवर, प्राचीन नाणेघाटाच्या तोंडाशी आणि घाटघर गावाच्या हद्दीत. उंची समुद्रसपाटीपासून ११४५ मीटर!खडकात खोदलेल्या पायऱ्यांचा हा मार्ग! पण ब्रिटिशांनी आमच्या अनेक किल्ल्यांच्या वाटांची जी वाट लावली त्यामध्ये जीवधनच्या या दोन्ही मार्गानाही त्यांनी सुरुंग लावले.
याच्या खुणा आजही दिसतात. यामुळे हा पायऱ्यांचा मार्ग एक-दोन ठिकाणी तुटला आहे. या तुटलेल्या भागात उभ्या कातळातील टप्पे आडवे येतात. या वेळी त्यामध्ये असलेल्या खोबण्यांचा आधार घेतच वर सरकावे लागते. प्रस्तरारोहणाचे हे दोन टप्पे पार पडले, की आपण गडाच्या पहिल्या दरवाजात पोहोचतो. पूर्वेकडील या दरवाजाच्या उद्ध्वस्त कमानीतून आपण आत प्रवेश करतो. या दारालगतच एकात एक गुंफलेल्या पाच पाण्याच्या टाक्या दिसतात. यातील काही पहारेक ऱ्यांच्या खोल्या वाटतात.
गडात प्रवेश करताच फोफावलेल्या गवतातून अनेक उद्ध्वस्त अवशेष माना वर काढतात. मध्यभागी बालेकिल्ल्याची टेकडी आणि तिच्या भोवताली हा वास्तू परिसर! सुरुवातीलाच लक्ष जाते ते या टेकडीलगत दडलेल्या एका बांधकामाकडे! एखादे लेणे वाटावे अशी ही वास्तू! दर्शनी भागात बांधकाम तर पाठीमागे खोदकाम! मुखमंडपवजा प्रवेशद्वार, त्यावर ते संपन्नतेचे प्रतीक असलेले गजान्तलक्ष्मीचे शिल्प! दोन्ही बाजूने जलधारा सोडणारे हत्ती, तर मध्यभागी ती लक्ष्मीदेवता! या शिल्पाच्या खाली पुन्हा चंद्र-सूर्याची शुभप्रतीके!