श्री क्षेत्र आणे उत्सव – प्रतिक साबळेभाकरी-आमटीची मिरवणूक काढण्याची दीडशे वर्षांची आगळी-वेगळी परंपरा!भाकरी आणि आमटीची मिरवणूक काढण्याची एक आगळी-वेगळी प्रथा जुन्नर तालुक्यातील आणे गावात पाहायला मिळते. रंगदास स्वामींच्या पुण्यतिथीच्या निमित्त भरवण्यात येणाऱ्या या यात्रेत येणाऱ्या हजारो भाविकांना तीन दिवस आमटी आणि भाकरीचा प्रसाद दिला जातो. त्यासाठी आणे गावच्या पंचक्रोशीतील प्रत्येक घरातून बाजरीच्या हजारो भाकरी जमा केल्या जातात. याशिवाय हजारो लीटर आमटी तयार केली जाते. त्यानंतर जमा झालेल्या भाकारींची वाजत-गाजत मिरवणूकही काढली जाते.
जुन्नर तालुक्यातील आणे गावात यात्रेच्या निमित्तानं एक जगावेगळी मिरवणूक निघते. मात्र डीजेच्या तालावर निघणारी ही मिरवणूक ही कोणा देवाची वा नवरदेवाची नसते तर ती असते बाजरीच्या भाकरींची. हो, आणे गावच्या पंचक्रोशीतून अशाप्रक्रारे वाजत-गाजत टेंपो, ट्रक, जीप अशा जमेल त्या वाहनातून बाजरीच्या भाकरी गावात आणल्या जातात.पूर्वी ढोल ताशांच्या गजरात या भाकरींची मिरवणूक बैलगाडीतून निघायची, मात्र आता डीजेच्या तालावर वाहनातून ही मिरवणूक निघते. रंगदास स्वामींच्या पुण्यतिथीच्या निमित्त आणे गावात तीन दीवस चालणाऱ्या यात्रेत आमटी आणि भाकरीचा प्रसाद दिला जातो. त्यासाठी घराघरातून भाकरी जामा केल्या जातात. प्रत्येक घराने दीड शेराच्या भाकरी द्यायच्याच हा नियम गेली दीडशे वर्षे काटेकोरपणे जपला जातो. त्यामुळं जमा होणाऱ्या या बाजरीच्या भाकरींनी अक्षरश: एक खोली भरून जाते.
एकीकडे भाकरींच्या चवडी वाढत असतात तर दुसरीकडे या भाकरीसाठी आमटी बनवणं सुरु असतं. भल्या मोठ्या लोखंडी काहीलींमध्ये ही आमटी बनवावी लागते. तूर डाळ, गुळ, खोबरं आणि गरम मसाल्यापासून बनणाऱ्या या आमटीसाठी चक्क मोटर लाऊन पाणी काहिलीत सोडलं जात.एका काहिलीत साधारणपणे पाचशे लिटर आमटी तयार होते. अशा पस्तीस पेक्षा अधिक काहिल्या आमटी तीन दिवसात बनवावी लागते. पण सारं गावच या कामासाठी सरसावलेलं असल्याने हे कामही चुटकीसरशी पार पडतं.प्रसादाच्या पहिल्या काहीलीतील आमटी उकळू लागताच रंगनाथ स्वामींच्या मंदिरात आरतीला सुरुवात होते. आरतीनंतर स्वामींना आमटी आणि भाकरीचा नैवैद्य दाखवला जातो आणि पंगतीनां सुरुवात होते.लहान-मोठे असा भेद विसरून एरवी जपल्या जाणाऱ्या आपाआपल्या ओळखी विसरून सारेजण एकत्र पंगतीला बसतात. सर्वांसाठी प्रसादही एकच असतो आमटी आणि भाकरी. या आमटी आणि भाकरीची चव दूसरीकडं कुठचं मिळत नाही, असं प्रसाद खाणारे आवर्जून सांगतात.दीडशे वर्षांपूर्वी रंगनाथ स्वामी उत्तर भारतातून येऊन आणे गावच्या मारुतीच्या मंदिरात राहिले. गावच्या यात्रेत आधी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जायचा. पण तो नैवेद्य करणं अनेकांना जमायचं नाही. त्यामुळं रंगनाथ स्वामींनी या भागात मोठ्या प्रमाणात पिकणाऱ्या बाजरी आणि तूरीपासून बनणाऱ्या आमटी-भाकरीच्या प्रसादाची प्रथा सुरु केली. ती आजतागायत सुरु आहे.प्रत्येकवर्षी तीन व्यक्तींकडून आमटीसाठी लागणारं साहित्य दान म्हणून स्वीकारलं जातं. आमटीचा खर्च करण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ असते.यात्रेच्या या तीन दिवसांत आणे गावच्या पंचक्रोशीत घरी जेवण बनवलंच जात नाही. कामानिमित्त बाहेरगावी राहणारे, शिकले सवरलेले, एरवी जेवता-खाताना नियम पाळणारेही इथं पंगतीला बसतात. ताटात भाकरी चुरून त्यावर गरमा-गरम आमटी ओततात आणि भुरका मारत प्रसाद घेतात. कारण अणे गावच्या यात्रेत पसाद घेण्याची हीच पद्धत आहे.